The article taken from following link:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=25208:2009-11-20-05-31-05&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=25208:2009-11-20-05-31-05&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
रविवार, २२ नोव्हेंबर २००९
कुमार केतकर‘२६/११’ सारखे हल्ले पुन्हा होऊ शकतील? वस्तुस्थिती ही आहे की, पाकिस्तान नष्ट करूनही जगातील दहशतवाद नाहीसा होणार नाही. कारण आता जगाला भेडसावणाऱ्या दहशतवादाचे स्वरूप जागतिक आहे आणि आता तर दहशतवाद्यांच्या संघटनांचे स्वरूप ‘कॉर्पोरेट’ झाले आहे. ‘२६/११’ चे एक केंद्र मध्यपूर्व आशियात म्हणजे इस्राएल-पॅलेस्टिन पट्टय़ातही असू शकते. त्यामुळे इस्राएल-पॅलेस्टिन प्रश्नावर, त्याचप्रमाणे अफगाणिस्तान आणि इराक येथील यादवींवर सामोपचाराने तोडगा निघत नाही, तोपर्यंत दहशतवादाचा धोका कायमच राहील..
मुंबईवर आणखी एखादा असाच थरारक आणि हिंस्र दहशतवादी हल्ला होऊ शकेल का? एखाद्या लोकप्रिय वा ज्येष्ठ राजकीय नेत्याची हत्या शक्य आहे का? संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवून आठ वर्षे होत आली आहेत. अशाच एखाद्या राष्ट्रीय वास्तूवर आकस्मिक हल्ला होण्याची शक्यता किती आहे? ..असे प्रश्न अनेकांच्या मनात भुतासारखे भिरभिरत असतात. त्यातून इतरही संभाव्य प्रश्न निर्माण केले जातात. अणुकेंद्रावर, तेलाच्या रिफायनरीवर, संरक्षण खात्याच्या कचेरीवर जर एकदम असा हल्ला झालाच, तर त्याचा ‘बदला’ म्हणून वा ‘कायमची कटकट’ मिटवून टाकण्यासाठी भारत थेट पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारेल का? त्या युद्धाचे परिणाम काय होऊ शकतील? वगैरे वगैरे.
आपल्याकडे काही ‘तज्ज्ञ’ मंडळी अशीही आहेत की, ती म्हणतात- आणखी एखादा दहशतवादी हल्ला व्हायची वाट पाहायची गरज नाही, पाकिस्तान नकाशावरून कायमचाच नष्ट करायला हवा, भले भारताला कितीही किंमत द्यावी लागो!
या सर्व चर्चेमध्ये असे गृहित धरलेले असते की, दहशतवादी हल्ले फक्त (वा मुख्यत:) पाकिस्तानच घडवून आणते. दुसरे गृहितक असे की, दहशतवादी हे ‘इस्लाम’च्या रक्षणासाठी (वा इस्लामी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी) असे हल्ले घडवून आणतात.
पहिली गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती ही की, गेल्या १० वर्षात दहशतवाद्यांनी जेवढे हल्ले खुद्द पाकिस्तानातच घडवून आणले आहेत, तेवढे भारतात घडवून आणलेले नाहीत. लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा किमान पाच वेळा त्यांच्या खुनाचे प्रयत्न झाले आणि त्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्यांचे सुरक्षासैनिक मरण पावले. बेनझीर भुत्तोंच्या हत्येला पुढील महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. या दोन वर्षात तर जवळजवळ प्रत्येक आठवडय़ाला एक या प्रमाणात दहशतवादी हल्ले पाकिस्तानात झाले आहेत. मुशर्रफ यांना त्यांच्या कारकीर्दीत दहशतवाद्यांनी कब्जा केलेल्या लाल मशिदीवर करावी लागलेली लष्करी चढाई तर सर्वानाच आठवत असेल. त्यानंतर आजपर्यंत पोलीस कचेऱ्या, लष्करी ठाणी, पंचतारांकित हॉटेल्स, आयएसआयची ऑफिसेस, राजदूतावास, विद्यापीठ अशा कुठल्याही ठिकाणी हल्ले करून दहशतवाद्यांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना बेजार करून टाकले आहे. अध्यक्ष झरदारींवर थेट हल्ला करण्याचे दोन प्रयत्न फसले आहेत.
म्हणजेच भारताने काही करण्याऐवजी दहशतवादीच पाकिस्तान उद्ध्वस्त करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी ‘इंडिया टुडे’ या साप्ताहिकाने ‘पाकिस्तान वाचेल का?’ अशा अर्थाची कव्हर स्टोरी प्रसिद्ध केली होती. त्यात पाकिस्तान झपाटय़ाने विघटनाच्या मार्गाने जात असल्याचे म्हटले होते. बलुचिस्तान तर धुमसतोच आहे आणि तालिबान्यांनी त्यांच्या तोफा-बंदुका आता पाकिस्तानच्या राजवटीवरच रोखल्या आहेत.
मुद्दा हा की, भारताने युद्ध करून त्यातून काहीही साध्य होणार नाही. उलट त्या युद्धाचे निमित्त होऊन पाकिस्तानी लष्कर, दहशतवादी गट आणि राजकीय पक्ष यांची एकच फळी उभी होऊन भारताला अधिकच धोका निर्माण होईल. आज स्वत:चे घर आणि जीव वाचवता- वाचवतानाच त्या सर्वाचा धीर सुटत चालला आहे!
तरीही सुरुवातीला उपस्थित केलेले प्रश्न भेडसावत राहणारच आहेत- गेल्या वर्षीच्या २६ नोव्हेंबरसारखे आणखी काही हल्ले भारतात होण्याची शक्यता आहे का?, हा तर सर्वाच्या मनातला कळीचा प्रश्न. या प्रश्नाचे सरळ आणि स्पष्ट उत्तर हे आहे की, दहशतवादी हल्ल्यांचा धोका भारताला तर आहेच, पण जगातील बऱ्याच देशांना आहे. दहशतवादाचे भूत कायमचे गाडले जाण्याची शक्यता किमान पुढील २५-३० वर्षे नाही. दहशतवादाचे एक केंद्र म्हणजे पाकिस्तान. तो नष्ट झाला तरीही हा भस्मासुर आटोक्यात येण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात नाही. कारण या भस्मासुराचे आता अनेक अवतार निर्माण झाले आहेत. या भस्मासुरांच्या कॉर्पोरेट कंपन्या झाल्या आहेत. त्यांना प्रचंड प्रमाणावर, उघड व गुप्तपणे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत आहे. ठिकठिकाणचे तरुण ‘मानवी बॉम्ब’ व्हायला वा दहशतवादी फौजेत सामील व्हायला तयार होत आहेत.
पाकिस्तान-अफगाणिस्तानचा पट्टा जरी सर्वात प्रक्षोभक भासत असला, तरी आता लिबिया, इराक, इराण, सुदान, इजिप्त अशा अनेक ठिकाणी दहशतवादी गट निर्माण होत आहेत. अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणाऱ्या १९ दहशतवाद्यांपैकी १५ जण सौदी होते. (इराकी व अफगाण कुणीच नव्हते.)
या सर्व संहारक अस्वस्थतेचा केंद्रबिंदू इस्राएल- पॅलेस्टिन या पट्टय़ात, स्वाभाविकच मध्यपूर्व आशियातील अरब राष्ट्रात आणि पर्यायाने पाकिस्तान- अफगाणिस्तान या भागात आहे. या सर्व विध्वंसक स्थितीला केवळ पाकिस्तान जबाबदार नाही. अमेरिका आणि तितक्याच वा त्याहूनही जास्त प्रमाणात इस्राएल यांनी या भस्मासूरांना जन्माला घातले आहे. शीतयुद्ध अगदी टोकाला गेलेले असताना १९७९ साली ही ‘भस्मासुरांची फॅक्टरी’ निर्माण झाली.
व्हिएतनाम युद्धात दारूण पराभव झालेली अमेरिका आपले जागतिक प्रभुत्त्व पुन्हा कसे प्रस्थापित करता येईल, याचा विचार करीत होती. अमेरिकाच इस्राएलचा तारणहार असल्याने इस्राएलही भयग्रस्त झाले होते. इस्राएलला भौगोलिक वेढा असलेल्या सर्व देशांशी सोविएत युनियनचे मैत्रीचे (व लष्करी मदतीचे) संबंध होते.
युद्धात जिंकलो नाही, पण तहांमध्ये तरी आपण आघाडीवर राहावे, अशी परराष्ट्रनीती स्वीकारून १९७८-७९ साली अमेरिकेने इस्राएल व इजिप्त या दोन देशात शांतता करार करून घेतला. तेव्हा इजिप्तचे अध्यक्ष होते अन्वर सादत. गमाल अब्देल नासेर यांच्या नावाने जगभर परिचित असलेला इजिप्त हा अमेरिकाविरोधी आणि सोविएत युनियनचा मित्र मानला जात असे. परंतु इजिप्तच्याच सादत यांनी इस्राएलबरोबर शांतता करार केला आणि तोही अमेरिकेच्या आशीर्वादाने झाल्यामुळे एकूणच अरब देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातून इस्राएलने त्यांचा अरब आणि इस्लामविरोध अजिबातच मवाळ केला नाही आणि त्यामुळे शांतता करारानंतर वातावरण अधिकच कलुषित होत गेले. राष्ट्रीय संचलनाच्या वेळेस एका इजिप्तच्या सैनिकाने थेट सादत यांनाच लक्ष्य करून ठार केले. इजिप्त-इस्राएल मैत्री करारावर पुन्हा सावट आले. तेव्हापासून अमेरिकेने इस्राएलच्या सर्व आक्रमक धोरणांना अधिकाधिक पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
त्याच सुमाराला आणखी तीन घटना घडल्या, की ज्यामुळे दहशतवाद आणि राजकारण हे जोडले गेले- ते अगदी आजपर्यंत. पहिली घटना म्हणजे अमेरिकेने पाळलेली, पोसलेली आणि जपलेली इराणच्या शहांची राजवट उलथून टाकून तेथे शिया इस्लामिक क्रांती झाली. आयातोला खोमेनींनी सत्तेची सूत्रे हाती घेताच घोषणा केली की, अमेरिका व इस्राएल या दोन सैतानी राजवटी नष्ट केल्याशिवाय जगाला स्वास्थ्य प्रश्नप्त होणार नाही. दुसरी घटना म्हणजे त्याच वर्षी सोविएत फौजा अफगाणिस्तानात घुसल्या आणि त्यांनी त्या भागातील अमेरिकन प्रभावाला आव्हान दिले. तिसरी घटना म्हणजे इराणच्या राजधानीत तेहेरान येथे तेथील इस्लामी विद्यार्थी क्रांतिकारकांनी अमेरिकन दूतावासातील लोकांना ओलीस ठेवून ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनांमुळे अमेरिकेतील राजकारण अधिकच उजव्या बाजूला व युद्धखोरीकडे झुकू लागले. १९८० च्या अध्यक्षीय निवडणुकीत मवाळ अध्यक्ष जिमी कार्टर यांचा पराभव होऊन जहाल उजव्या विचारांचे रोनाल्ड रिगन निवडून आले. त्याच सुमाराला पाकिस्तानमध्ये लष्करशहा झिया-ऊल-हक यांनी आपली सत्तेवरची पकड अधिक घट्ट केली होती. (१९७७ साली पदच्युत केलेले झुल्फिकार अली भुत्तो यांना ‘लष्करी’ न्यायालयाने ४ एप्रिल १९७९ रोजी फाशी दिले.) झिया यांना अर्थातच अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा होता- आर्थिक, राजकीय आणि लष्करी.
पाकिस्तानची इस्लामी राजवट आता अमेरिकेला सोविएत युनियनच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये, खोमेनीच्या विरोधात इराणमध्ये आणि इंदिरा गांधींच्या विरोधात भारतात वापरायची होती. खलिस्तानी दहशतवाद हा १९८० ते १९८७ या काळातच फोफावला. त्यांनी सुवर्णमंदिरावर कब्जा केला, तेथूनच त्यांना स्वतंत्र खलिस्तानची घोषणा करायची होती, पण इंदिरा गांधींनी त्यांचा तो कट उधळून लावला.
या सर्व पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला अमेरिकेने पोसलेले होते. शीतयुद्धाच्या काळात स्वत:चे वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने तीन राजकीय तळ उभे केले होते- पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि इस्राएल.
पाकिस्तानची मदत घेऊन अफगाणिस्तानात इस्लामी धर्मवाद अमेरिकेनेच वाढविला. सौदी अरेबियाची मदत घेऊन एका बाजूला इराणला व दुसऱ्या बाजूला इराकला शह दिला आणि इस्राएलला सर्व प्रकारचे सहाय्य करून अरब देशांवर वचक ठेवला. परंतु, सत्तेच्या शतरंजवरील मोहरे असे खेळवून त्या देशांमधली जनता आटोक्यात राहतेच असे नाही.
इस्राएल हा अमेरिकेच्या पाठिंब्यावरच मध्यपूर्व आशियात मुजोरी करतो, पॅलेस्टिनी जनतेवर अत्याचार करतो आणि लेबेनॉनमध्ये घुसून आपली दहशत बसवतो हे सर्व अरब-मुस्लिम देशांना दिसत होते. जोपर्यंत अमेरिका-इस्राएल आणि अमेरिका-पाकिस्तान त्याचप्रमाणे अमेरिका-सौदी यांचे नेटवर्क उधळले जात नाही, तोपर्यंत जगात शांतता नांदणे शक्य नाही. इस्राएलच्या आजूबाजूच्या सर्व अरब-मुस्लिम देशांमधील जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदतो आहे. त्यातूनच दहशतवादी निर्माण होत आहेत. त्यांचा शत्रू केवळ भारत नाही, तर जो कुणी त्यांच्या दृष्टिकोनातून इस्राएलचा मित्र असेल, तो त्यांचा शत्रू आहे. कारण पॅलेस्टिनला त्यांची भूमी परत मिळू नये, त्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण होऊ नये म्हणून इस्राएलने अमेरिकेच्या मदतीने सर्वत्र राजकीय सुरुंग पेरून ठेवलेले आहेत. ते सुरुंग उधळण्यासाठी या सर्व प्रदेशात जे तरुण आघाडीवर येत आहेत, ते हे नव-दहशतवादी आहेत.
ते कुठच्याही विशिष्ट देशासाठी लढत नाहीत. खरे म्हणजे ते धर्मासाठी लढतात, असेही म्हणण्यासारखी स्थिती नाही. कारण अमेरिकेला वश होणाऱ्या सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. अमेरिका-इंग्लंड-इस्राएल यांचा प्रभुत्ववाद उधळण्यासाठी ते लढत असले तरी आता हा भस्मासुर त्यांच्याही संघटनेच्या कक्षा ओलांडून पुढे गेला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेला गर्दचा व्यापार, शस्त्रास्त्रांचा बेफाम काळाबाजार आणि दहशतवाद्यांच्या टोळ्या एकत्र आल्या आहेत. आता दहशतवाद हा एक ‘मल्टिनॅशनल कॉर्पोरेट बिझिनेस’ झाला आहे. म्हणूनच तथाकथित इस्लामी-तालिबानी दहशतवादी पाकिस्तानवर वा त्या त्या भागातील मुस्लिम लोकांवरही हिंस्र हल्ले करीत आहेत.
या सर्व धुमश्चक्रीत हा भस्मासुर आपल्यावरच उलटला तर आकाराने अगदी लहान असलेला इस्राएल केव्हाच नष्ट होईल, ही भीती त्या देशाला आहे. ‘मोसाद’ या त्यांच्या कारस्थानी (व क्रूर) हेरखात्याचा जन्म या भस्मासुराला वेसण घालण्यासाठीच असला तरी त्या ‘भस्मासुराची फॅक्टरी’च वर म्हटल्याप्रमाणे अमेरिका-इस्राएल यांच्या संयुक्त राजकारणातून निर्माण झाली आहे.
सीआयए या अमेरिकन गुप्तहेर संघटनेविषयी आपण नेहमी ऐकत असतो. कट-कारस्थाने, खून-हत्याकांड असे कोणतेही मार्ग अनुसरून अमेरिकेला अनुकूल असे सत्तापालट घडवून आणणारी हेरसंस्था म्हणून सीआयएची (कु) ख्याती आहे.
सीआयएच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक ‘कारवायां’बद्दल चर्चा असे. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना पैसे पुरविणे, विचारवंतांना/ प्रश्नध्यापक वर्गाला विविध आमिषांनी वश करून घेणे, कामगार पुढारी हाताशी धरून ट्रेड युनियन चळवळीत हस्तक्षेप करणे असले उद्योगही सीआयए करीत असते. कम्युनिस्ट रशियाची केजीबी ही हेरसंस्थाही असेच धंदे करण्यात माहीर होती. या दोन हेरसंस्थांविषयी प्रचंड प्रमाणावर ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. बऱ्याच (माजी) गुप्तहेरांनी त्यांच्या कुटिल-कपटी आठवणीही लिहिल्या आहेत. परंतु तुलनेने ‘मोसाद’ या इस्राएली गुप्तहेर संस्थेविषयी फारच कमी माहिती उपलब्ध असते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीएसटी स्टेशन, ताज, ट्रायडंट-ओबेरॉय, कामा हॉस्पिटल, लिओपाल्ड कॅफे यांच्याबरोबर नरिमन हाऊस या इमारतीवरही हल्ला झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. ‘छबाद हाऊस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत इस्राएली ज्यूंनी धर्माच्या आवरणाखाली ‘मोसाद’चे केंद्र चालविले आहे, अशी ‘अल कायदा’ची माहिती होती, असे सांगितले जाते.
‘मोसाद’चे ते मुंबईतील केंद्र उडवून टाकण्याचे आदेश पाकिस्तानातील ‘अल् कायदा’च्या दहशतवादी पथकांना मिळाले होते. काही हेरतज्ज्ञ तर असेही मानतात की, रेल्वे स्टेशन, ताज वगैरेंवरचे हल्ले हे भारतीय गुप्तहेरांची दिशाभूल करण्यासाठी केले गेले. त्यांचे खरे लक्ष्य होते, नरिमन हाऊस ऊर्फ छबाद हाऊस.
म्हणजेच जगातील काही ‘इस्लामी’ दहशतवाद्यांचे युद्ध मुख्यत: इस्राएलशी आहे आणि त्याचे मूळ इस्राएलच्या आक्रमक धोरणांमध्ये आहे. अमेरिकेचे आर्थिक व लष्करी पाठबळ नसेल तर इस्राएल हा देश एक दिवसही अस्तित्वात राहू शकणार नाही, असे ‘अल् कायदा’चे संघटक मानतात. साहजिकच, जो देश वा जी संस्था इस्राएलच्या आक्रमक हेतूंना मदत करते, ते सर्व इस्लामी जिहादींचे शत्रू आहेत. त्यामुळे पाकिस्तान ‘नष्ट’ करूनही जगातील दहशतवाद नाहीसा होणार नाही. जोपर्यंत इस्राएल-पॅलेस्टिन प्रश्नावर सामोपचाराने तोडगा निघणार नाही, तोपर्यंत दहशतवादाचा धोका जगाला भेडसावत राहील. ‘२६/११’ पासून आपणही हा बोध घ्यायला हवा.
डबल एजंट?
दाऊद गिलानी ऊर्फ डेव्हिड कोलमन हेडली आणि त्याचा सहकारी तहव्वुर राणा हे दोघेजण अमेरिकन पासपोर्टवर भारतात आले. त्यांनी अनेक शहरांना भेटी दिल्या. नेमक्या ज्या ज्या ठिकाणी हेडली राहिला, त्याच्या जवळपासच दहशतवाद्यांनी भीषण हल्ले केले. त्याच भागात त्यांनी त्यांचे नेटवर्क उभे केले. गेली किमान वर्ष-दीड वर्ष अमेरिकन गुप्तहेर खाते हेडलीच्या हालचालींवर नजर ठेवून होते. परंतु ही माहितीसुद्धा भारतीय हेर व पोलीस खात्याकडे अमेरिकेकडूनच आली आहे. त्यामुळे ती माहिती पूर्ण असेलच असे नाही. शिवाय त्यात अमेरिकेने हेही स्पष्ट केलेले नाही, की हेडलीचा संशय त्यांना नक्की कशामुळे, केव्हा आणि कसा आला.
कुणी अशीही शंका व्यक्त करू शकेल की हेडली हा ‘सीआयए’चाच ‘डबल एजंट’ कशावरून नव्हता? किंवा पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चाही ‘डबल एजंट’ तो कशावरून नसेल? पाकिस्तानी नागरिक आपले मुस्लिम नाव बदलून ख्रिश्चन नाव धारण करतो, पाकिस्तानी नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व घेतो आणि पासपोर्टही अमेरिकेतून प्रश्नप्त करतो हे सर्व सीआयए आणि एफबीायच्या माहितीशिवाय (खरे म्हणजे संगनमताशिवाय) शक्य नाही. अमेरिकेला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ‘इमिग्रेशन अॅण्ड नॅचरलायझेशन’ खात्यामार्फत जाताना अनेक वेळा किती अपमान वा जाच सहन करावा लागतो, हे बऱ्याच जणांना माहीत आहे. शिवाय मूळ मुस्लिम, त्यातूनही पाकिस्तानी वा अरब माणूस ‘मोसाद’ या इस्राएल गुप्तहेर संस्थेच्या नजरेतून सुटेल, हे संभवत नाही. ‘मोसाद’ फक्त इस्राएलच्या हितसंबंधांकडे पाहात नाही, तर अमेरिकेत अशा रीतीने येणाऱ्या सर्वावर नजर ठेवते. हेडलीने पुण्याच्या ज्यू वस्तीवर आणि मुंबईच्या ‘छबाद हाऊस’वर विशेष नजर ठेवली होती, हे आता उघडकीस आले आहेच. तो ‘मोसाद’चा डबल एजंटही असू शकतो!

No comments:
Post a Comment